अनंत अंबानींच्या खांद्यावर नवीन जबाबदारी   

मुंबई : रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड (RIL) चे अध्यक्ष मुकेश अंबानी यांनी 2022 मध्येच आपल्या तीन मुलांमध्ये कंपनीच्या विविध व्यवसायांची जबाबदारी विभागली होती. लाडकी लेक ईशा अंबानी यांना रिटेल क्षेत्राची जबाबदारी दिली गेली तर, मोठा मुलगा आकाश अंबानी यांना टेलिकॉमची जबाबदारी मिळाली आणि धाकटा मुलगा अनंत अंबानी यांना ऊर्जा क्षेत्राची जबाबदारी देण्यात आली. मात्र, धाकट्या मुलाच्या कामाची दखल घेत मुकेश अंबानींनी अनंतच्या खांद्यावर नवी जबाबदारी दिली आहे. 
 
रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडने अनंत अंबानी यांची कार्यकारी संचालक म्हणून नियुक्ती केली, १ मे २०२५ पासून त्यांचा कार्यकाळ सुरू होईल. म्हणजे आता मुकेश अंबानींचा धाकटा मुलगा भारतातील सर्वात मौल्यवान कंपनीत एका महत्त्वाच्या पदावर असेल.

अनंत अंबानींच्या खांद्यावर नवीन जबाबदारी

ही नियुक्ती पाच वर्षांच्या कालावधीसाठी केलीआणि भागधारकांच्या मंजुरीनंतर अंतिम केली जाईल. रिलायन्सच्या दीर्घकालीन उत्तराधिकार योजनेअंतर्गत मुकेश अंबानींनी पाऊल उचलले आहे. अनंत अंबानी सध्या कंपनीत बिगर कार्यकारी संचालक म्हणून काम करत होते तर, नवीन महिन्यापासून रिलायन्सच्या कार्यकारी नेतृत्वाचा भाग बनतील.
 
स्वच्छ इंधन, कार्बन कॅप्चर तंत्रज्ञान, पुनर्वापर आणि क्रूड-टू-केमिकल्स यासारख्या नाविन्यपूर्ण प्रकल्पांसह रिलायन्सचे २०३५ पर्यंत निव्वळ शून्य कार्बन कंपनी बनण्याचे उद्दिष्ट असून यामध्ये अनंत अंबानींची भूमिका महत्त्वाची असणार आहे.
 
मार्च २०२० पासून अनंत अंबानी जिओ प्लॅटफॉर्म लिमिटेडच्या बोर्डवर आहेत तर, मे २०२२ पासून त्यांनी रिलायन्स रिटेल व्हेंचर्स लिमिटेडच्या बोर्डातही योगदान देण्यास सुरुवात केली. याशिवाय, जून २०२१ पासून रिलायन्स न्यू एनर्जी लिमिटेड आणि रिलायन्स न्यू सोलर एनर्जी लिमिटेडच्या बोर्डवर असून सप्टेंबर २०२२ पासून ग्रुपची परोपकारी शाखा असलेल्या रिलायन्स फाउंडेशनच्या बोर्डावर देखील आहेत. अशाप्रकारे, ब्राउन विद्यापीठातून पदवीधर झालेल्या अनंत यांना कंपनीच्या विविध प्रमुख क्षेत्रांमध्ये नेतृत्वाचा अनुभव मिळाला आहे.

कोणा कोणावर काय जबाबदारी ?

रिलायन्स इंडस्ट्रीजमध्ये कार्यकारी संचालकपदाची जबाबदारी सांभाळणारे अंबानी परिवाराच्या तिसऱ्या पिढीतील अनंत पहिलेच सदस्य असतील. त्यांचा भाऊ आकाश अंबानी २०२२ पासून जिओ इन्फोकॉमचे अध्यक्ष आहे आणि बहीण ईशा अंबानी पिरामल रिलायन्स रिटेल व्यवसायाचे नेतृत्व करत आहेत.
 

Related Articles